शिराळा नगरपंचायतमार्फत घरकुल आढावा बैठक संपन्न

शिराळा नगरपंचायत मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांपैकी पथदर्शी योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) या योजनेअंतर्गत ३ प्रकल्प राबवून अनेक गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला. यानंतरही अद्यापही गरजू कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळावा या हेतूने 205 लाभार्थ्यांसाठीचा ४ था प्रकल्प मंजूर करण्यात आला. त्याची अंमलबजावणी सध्या नगरपंचायत मार्फत शहरात युद्धपातळीवर सुरु आहे. योजनेच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन व शंकांचे निरसन करणे तसेच अनुदान वितरीत करण्याच्या अनुषंगाने दिनांक ०४/०१/२०२३ रोजी शिराळा नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ४.00 वाजता व्यापारी असोसिएशन सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रशासकांनी उपस्थित नागरिकांच्या, बांधकाम नियोजन आराखडा तयार नसणे, साहित्याचा तुटवडा, जागा मालकी बाबतच्या अडचणी ,आर्थिक अडचणी इत्यादी प्रकारच्या अनेक अडचणी जाणून घेत त्यातून मार्ग काढण्याच्या हेतूने उपयुक्त व परिणामकारक मार्गदर्शनही केले ज्या लाभार्थ्यांनी अद्याप प्रत्यक्षात परवानगी बाबतची कागदपत्रे पूर्ण केलेली नाहीत त्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे पूर्तता करून परवानगी अंती बांधकामे सुरू करणे बाबत सक्त सूचना उपस्थित लाभार्थी व संबंधित विभाग प्रमुखाना देत घरकुल पूर्णत्वासाठी सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. या मंजूर प्रकल्पातील एकूण लाभार्थ्यांपैकी कामे सुरू केलेल्या 65 लाभार्थ्यांच्या कामाच्या प्रगतीबाबतची माहिती भरण्यात आली असून योजनेसाठीचा मंजूर पहिला हप्ता प्रत्येकी रक्कम रुपये 40,000/- प्रमाणे संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच पहिला हप्ता वर्ग होणार असल्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी सांगितले. तसेच येणारा गुढी पाडवा सण हा नवीन घरात साजरा करण्याचे आवाहन प्रशासकांनी सर्व उपस्थित लाभार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रधानमंत्री आवास योजना स्थापत्य अभियंता श्री. मुनीर लंगरदार यांनी केले.तसेच पाणीपुरवठा अभियंता श्री. शरदचंद्र विजयसिंह पाटील यांनी उपस्थित लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल पूर्ण करून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन करत आभार व्यक्त केले. यावेळी नगरपंचायतीचे सर्व विभाग प्रमुख ,वार्ड लिपिक व कर्मचारी वर्ग तसेच सुमारे 130 घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

शिराळा शहरात गाडगे महाराजांची ६६ वी पुण्यतिथी साजरी
मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण व येलो बेल्ट मार्शल आर्ट प्रशिक्षण आयोजीत करण्यात येत आहे.